खेड : – मुंबई गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाटात एक सरकारी वाहन व एक एर्टिका गाडी अशा दोन्ही गाडयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या एका वाह‌नचालकाविरोधात सरकारी वाहनाचे चालक पोलीस शिपाई लतिकेश सखाराम मोरे यांनी दि. ४ मे २०२६ रोजी रात्री १० वाजता घडलेल्या या अपघाताची फिर्याद येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार संशयित आरोपी वाहनचालक प्रविण लक्ष्मण मालप (३९, रा. रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्याविरोधात दि. ५ मे २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर २:२२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई लतिकेश सखाराम मोरे यांच्या ताब्यातील सरकारी वाहन क्रमांक एमएच – ०८ बीई ३३९१ या वाहनाने सोबत खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस असे मुंबई गोवा महामार्गाने चिपळूण दिशेकडून खेडकडे येणाऱ्या दिशेने भोस्ते घाट उतरत असताना वाहन क्रमांक. एमएच – ४३ बीपी ८०९७ वरील चालक प्रविण लक्ष्मण मालप याने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपणे, रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक रस्त्यावर मानवी जीवीताला धोका निर्माण होईल अशा रितीने चालवून त्याच्यासमोरील एर्टिका गाडी क्रमांक एमएच – ०७ एएस २०२७ याला जोराची धडक दिल्यामु‌ळे इट्रीका गाडीची फिर्यादी पोलीस शिपाई लतिकेश मोरे यांच्या ताब्यातील सरकारी वाहन क्रमांक एमएच. ०८ बीई ३३९१ या पाठीमागून जोराची धडक लागून दोन्ही वाहनांच्या नुकसानीस व स्वतःच्या किरकोळ दुखापतीस वाहन क्रमांक एमएच – ४३ बीपी ८०९७ वरील चालक प्रविण लक्ष्मण मालप हा कारणीभूत झालेला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.