लांजा – लांजा पोलीस स्टेशनच्या दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला शनिवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, बेंजोच्या तालावर थिरकत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…! अशी आर्त विनवणी करता लांजा पोलिसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लांजा पोलीस स्टेशन येथून सुरुवात झाली. त्यानंतर लांजा शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मुंबई – गोवा महामार्गावरून ही विसर्जन मिरवणुक शहरानजीकच्या बेनीनदी येथे नेण्यात आली. याठिकाणी गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यांनतर बेनी नदी येथे रात्री उशिरा गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, या विसर्जन मिरवणुकीत लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.