चिपळूण : डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. १ जुलै रोजी चिपळूण-खेंड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विभा अरविंद ग्रंथालयाला स्नेहबंध मंच, चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. यतिन जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी स्नेहबंध मंचचे अध्यक्ष श्री. सिताराम शिंदे सर, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत कुलकर्णी सर, संचालिका श्रीमती नसरीन खडस, सचिव श्री. विकास ढवणसर, आणि संचालक श्री. विजय थोरे सर उपस्थित होते.
तसेच विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब काणे, ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रकाश देशपांडे काका ,कार्यवाह श्री. विजय कदम, तसेच माधवबाग क्लिनिक, चिपळूण येथील डॉ. स्नेहल नांगरे, डॉ. अश्विनी थाले आणि माधवबाग परिवारातील सदस्यही यावेळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांना ग्रंथालय उभारण्यामागील उद्देश सांगताना ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब काणे यांनी कै. अरविंद जाधव (अप्पा) यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. महसूल विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. राज्य कर्मचारी संघात संचालक पदावर काम करत असताना साहित्य क्षेत्राविषयी त्यांना विशेष तळमळ होती. यशस्वी लेखक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
अखिल भारतीय साहित्य संमेलन त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. तसेच अपरान्त संशोधन केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या काळात त्यांनी पाच लाख रुपयांची देणगी देऊन या केंद्राच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
कुटुंबाकडून मिळालेला साहित्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र आणि चिपळूणचे सुप्रसिद्ध डॉ. यतिन जाधव करत आहेत, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आपल्या आई- वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेलीं ही ग्रंथालय चळवळ समाजा साठी प्रेरणादायी असेलच असे गौरवोद्गार यावेळी श्री. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब काणे यांनी काढले.
डॉक्टर्स डे व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विभा अरविंद ग्रंथालयाला स्नेहबंध मंच चिपळूणची सदिच्छा भेट
