मंडणगड : मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे खरीप हंगामातील भात व नाचणी पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या पीक नुकसान पंचनाम्यांच्या प्रक्रियेची माहितीही त्यांनी घेतली.
यावेळी देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील आणि महसूल सेवक सुनित गमरे उपस्थित होते. त्यांनी शेतातील पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे स्वरूप आणि पंचनाम्यांबाबतची माहिती दिली.
“शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून उभे केलेल्या पिकांचे नुकसान होणे ही चिंतेची बाब आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे पंचनामे अचूक, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होणे आवश्यक आहे. शासनाच्या निकषांनुसार प्रत्येक पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळून त्याला आर्थिक दिलासा मिळावा,” अशी अपेक्षा अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केली.
