रायगड : जिल्ह्यातील नागाव येथील हॉटेल, रेस्टॉरंट, कॉटेज, रिसॉर्ट, ढाबे, होमस्टे, केटरिंग व्यावसायिक आणि मिठाई दुकानदारांसाठी नागाव ग्रामपंचायत सभागृहात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची योग्य माहिती, अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र पार पडले. नागावच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले हे पहिले चर्चासत्र यशस्वी झाले. या चर्चासत्राला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रथमेश माने यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ राऊळ यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात आवश्यक तें सहकार्य व नियोजन करण्याचे आश्वाशीत केले. या चर्चासत्रात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रथमेश माने यांनी FDA आणि FSSAI नियमांची अंमलबजावणी, अन्न व्यवसाय परवाना आणि नोंदणी प्रक्रिया, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी, स्वच्छता तसेच व्यावसायिकांनी पाळावयाच्या महत्त्वपूर्ण नियमांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थितांनी विचारलेले प्रश्न व शंका यांचं निरसन ही करण्यात आले.
याशिवाय कृत्रिम रंग आणि रासायनिक पदार्थांचा वापर, खाद्यतेलाचा सुरक्षित पुनर्वापर म्हणजेच RUCO नियम, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, FoSTaC फूड सेफ्टी प्रशिक्षण, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि तपासणीदरम्यान घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जागतीक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त नागाव येथील अन्नपदार्थांचा दर्जा आणि चव यांच्या माध्यमातून नागावचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आणि जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा निर्धार यावेळी सरपंच हर्षदा मयेकर व उपस्थित करण्यात हॉटेल व रेस्टोरंट व्यवसायिकानी व्यक्त केलाय.
नागाव परिसरात पर्यटन व्यवसायासोबतच हॉटेल, रेस्टॉरंट आणि विविध खाद्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. या व्यवसायांना अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी ग्रामपंचायत नागावच्या वतीने या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सरपंच हर्षदा मयेकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे चर्चासत्र यशस्वी झाले. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत व्यावसायिकांमध्ये जनजागृती करणे, नियमांबाबत असलेल्या शंका दूर करणे आणि भीतीऐवजी योग्य माहितीच्या आधारे नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
नागावमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना उत्तम चव, दर्जेदार खाद्यपदार्थ, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित अन्नाचा अनुभव मिळावा, यासाठी सर्व व्यावसायिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अन्नपदार्थांचा दर्जा आणि चव हीच नागावची ओळख बनवून या माध्यमातून गावाला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देण्याचा निर्धार या चर्चासत्रातून व्यक्त करण्यात आला.
ग्रामपंचायत नागावच्या या उपक्रमामुळे स्थानिक खाद्य व्यवसायांना योग्य दिशा मिळण्यास मदत होणार असून, पर्यटनवाढीसोबतच ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.