चिपळूण : गणेशोत्सवात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासातून चिपळूण आगाराला तब्बल ६८ लाख ७२ हजार ४५० रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने केलेल्या उत्तम नियोजनामुळे गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक या ठिकाणी नोकरी-धंद्यानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने चिपळूणला आले होते. पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी चिपळूण आगाराने उत्तम नियोजन केले होते. गाड्यांची आणि प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महामार्गाच्या कडेला असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकातून परतीच्या गाड्या सोडण्यात आल्या.
शिवाजीनगरमधून १९ सप्टेंबरपासून परतीच्या जादा गाड्या सोडण्यात येऊ लागल्या. २२ सप्टेंबरपर्यंत ८० टक्के गणेशभक्त चिपळूणमधून मार्गस्थ झाले. त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत दररोज १० याप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येत होत्या. या काळात ३१० जादा गाड्या आणि ३९६ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. जादा गाड्यांचा एकत्रित प्रवास १ लाख ६१ हजार ९४० किलोमीटर इतका झाला, तर १६ हजार ३८३ गणेशभक्तांना वेगवेगळ्या महानगरांमध्ये सोडण्यात आले. या माध्यमातून चिपळूण आगाराला ६८ लाख ७२ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न प्राप्त झाले. या व्यवस्थेसाठी चिपळूण आगाराच्या ८० गाड्या आणि सांगली डेपोच्या १०० गाड्या चिपळूणमध्ये आल्या होत्या.
चिपळूणमधील गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरळीत झाल्यामुळे चाकरमान्यांनी एसटी आगार प्रशासनाला धन्यवाद दिले.
