रोहा : रोहा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी रोहा तालुका अध्यक्ष मितेश भाई कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मंगळवारी रोह्यात पार पडली.या बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडे ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीत प्रामुख्याने रोहा नगर पालिके कडून लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीचा प्रश्न गाजला.वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी रद्द करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेणार आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनी कडून सक्तीने स्मार्ट मीटर लावण्याचे काम होत आहे.या स्मार्ट मिटर विषयी ग्राहकांवर एजन्सीने जबरदस्ती करु नये,तसेच
आव्वाच्या सव्वा येणाऱ्या वीज बिलांबद्दल नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे. ज्येष्ठ नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी होणारी गैरसोय तातडीने दूर करावी इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी. तालुका अध्यक्ष मितेश कल्याणी, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे, अल्पसंख्या सेल कार्याध्यक्ष
फैसल अधिकारी, जिल्हा खजिनदार रामप्रकाश कुशवाहा,जेष्ठ नेते बशीर भुरे,अकिल लांबते,अहमद खांबरे, नवीद चौगले आदी जण उपस्थित होते.