मुंबई : बसस्थानकावर स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने तृतीयपंथीय प्रवाशांना रोज कुचंबणा सहन करावी लागत होती. आता ती थांबणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) राज्यभरातील बसस्थानकांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. या कामांसाठी राज्य शासनाने ९ कोटी ७६ लाख ६३ हजार १९५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. परिवहन विभागाने याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी केला.
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रदेशांतील ३१ विभागांमधील विविध बसस्थानकांवर ही स्वच्छतागृहे बांधली जातील. प्रत्येक स्वच्छतागृह सुमारे सहा चौरस मीटरचे असेल. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि वीजजोडणीसह एका युनिटचा खर्च सुमारे २.४० लाख रुपये अपेक्षित आहे.

विभागनिहाय तरतुदीत कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे (५५.२० लाख रुपये). त्यानंतर अमरावती (५०.७५ लाख), अहिल्यानगर आणि नांदेड (प्रत्येकी ५०.४० लाख), नागपूर (४८.४० लाख) आणि रायगड (४८ लाख) या विभागांचा क्रमांक लागतो. मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, बीड, परभणी आणि विदर्भातील भंडारा, यवतमाळ या विभागांचाही योजनेत समावेश आहे.
या कामांचा संपूर्ण खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या तृतीयपंथीय कल्याण मंडळासाठी मंजूर असलेल्या निधीतून केला जाणार आहे. सामाजिक न्याय व परिवहन राज्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाला स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मान्यता तात्काळ द्यावी आणि निधी सामाजिक न्याय विभागाने वितरित करावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले होते.
काम सुरू करण्यापूर्वी नकाशांना वास्तुविशारदांची मंजुरी, विस्तृत अंदाजपत्रक आणि कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक असेल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची मागणी या समुदायाकडून सातत्याने होत होती. राज्याच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा निर्णय घेतल्याने त्या मागणीला ठोस प्रतिसाद मिळाला आहे.