रत्नागिरी : स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटली, देशाने विकासाची अनेक शिखरे गाठली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील पाचेरी सडा गावातील काही कुटुंबांची व्यथा आजही कायम आहे. खोत वठार आणि ब्राह्मणवाडी परिसरातील घरांकडे जाण्यासाठी आजही धड रस्ता नाही. काही वर्षांपूर्वी उभारलेला लोखंडी साकवही आता जीर्ण झाला असून, त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते. गावाशेजारील नदीला पूर आला की ये-जा करण्याचे सर्व मार्ग बंद होतात आणि काही काळासाठी गावाचा जगाशी संपर्क तुटतो. अशा वेळी घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा वयोवृद्ध व्यक्तीला बाहेर घेऊन जायचे असल्यास त्यांना अक्षरशः डोलीतून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर येते.

एका बाजूला गावाकडे परतण्याचे ‘रिव्हर्स मायग्रेशन’चे आवाहन केले जात आहे; मात्र दुसऱ्या बाजूला गावात पोहोचण्यासाठी साधा रस्ताही नाही. त्यामुळे मुंबई-पुण्यातील कुटुंबांनी पुन्हा गावाकडे परतायचे तरी कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या मूलभूत प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह भास्कर जाधव यांच्याकडेही ग्रामस्थांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.