मंडणगड : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा देव्हारे येथील विद्यार्थ्यांनी ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ देव्हारे बाजारपेठेत पथनाट्य सादर करून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी हातात संदेशफलक घेऊन बालहक्कांचे संरक्षण, बालकांचे संगोपन, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि सामाजिक जाणीव यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभावी संदेश दिले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. बाजारपेठेत सादर केलेल्या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी समाजातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत जनजागृतीचा संदेश दिला.

या उपक्रमावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. सुमेश घागरूम, उपाध्यक्ष दिनेश बोबले, सदस्य तुषार करावडे, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, शाळेचे मुख्याध्यापक भिकू बोर्ले, उपमुख्याध्यापिका विद्या पवार, पदवीधर शिक्षिका मनीषा ठोंबरे, पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश घागरूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी पदवीधर शिक्षक नितेश हुंबरे आणि व्यावसायिक समाधान तांबे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.