खेड : तालुक्यातील शिंगरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत पंचायत समिती खेड व चिपळूण तसेच कृषी विभाग खेड व चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २०० वनराई बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी आवश्यक प्लास्टिक उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे, पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करणे आणि भूजल पातळी वाढविण्यास हातभार लावणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात ग्रुप ग्रामपंचायत शिंगरी अंतर्गत पुरे खुर्द व पुरे बुद्रुक येथे २०० फूट लांबीचा वनराई बंधारा उभारून करण्यात आली.
या वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत शिंगरी, पुरे खुर्द व पुरे बुद्रुक येथील ग्रामस्थ, श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, लोटे आणि एक्सेल इंडस्ट्रीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन धाडवे यांचेसह, सर्व संबंधित संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून हा वनराई बंधारा उभारण्यात आला.
वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होते. तसेच परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास, जनावरांसाठी पाणी उपलब्ध होण्यास आणि शेतीच्या पाण्याची गरज भागविण्यास हातभार लागू शकतो. अशा उपक्रमांमुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होऊन गावपातळीवर पाणी व्यवस्थापनाला चालना मिळते. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा हा उपक्रम म्हणजे संस्था, शासन विभाग आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील गरजू गावांमध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी करून जलसंधारणाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जलसंधारणातून जलसमृद्धीकडे आणि लोकसहभागातून शाश्वत विकासाकडे वाटचाल करता येत आहे. हे वनराई बंधारे बांधण्याच्या स्तुत्य अशा सामाजिक बांधिलकीचा उपक्रमातुन दिसुन येत आहे.
पुरे बुद्रुक, पुरे खुर्द या गावात श्री विवेकानंद रिसर्च ॲड ट्रेनिंग इंस्टिट्यूट लोटे व एक्सल इंडस्ट्रीज लोटे यांच्या सहकार्यातून व ग्रामस्थांनी लोकसहभागातून 200 फुट लांबीचा वनराई बंधारा बांधला
