खेड : तालुक्यातील जामगे गावातील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कुल मध्ये तालुक्यातील माजी सैनिकांच्या समस्यांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करून, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कुल येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि समर्पणानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी सैनिकांच्या मेळाव्यात दिली.
यावेळी वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला, तर माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
खेड तालुक्यात माजी सैनिकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारीही मोठी आहे, असे सांगत योगेश कदम यांनी यापुढे नियमितपणे आढावा घेण्याचे आश्वासन दिले. तसेच दापोली मतदारसंघातील माजी सैनिक वसतिगृहाच्या ठिकाणी कॅन्टीन, वसतिगृह आणि विश्रामगृह यांसारख्या सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अग्निवीरांना पोलिस भरतीसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख करत, त्यांना भरतीची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून, देण्याचेही आश्वासन यावेळी ना. कदम यांनी दिले.