सावर्डे : रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा, प्रवाशांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी आणि सावर्डे रेल्वे स्थानकावर अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने पादचारी पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामामुळे स्थानिक प्रवाशांच्या सोयीमध्ये भर पडण्याची अपेक्षा आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम म्हणाले, “कोकण रेल्वेचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. आदरणीय पवार साहेब, निकम साहेब आणि बापट साहेब यांनीही कोकण रेल्वेसाठी मोलाचे काम केले आहे. आज सावर्डे रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तसेच प्रवाशांना अजून काही सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे.
सावर्डे येथे नवीन बुकिंग सेंटर सुरू व्हावे, उर्वरित रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा आणि बाजूला असलेल्या दुसऱ्या रेल्वेमार्गाचे कामही व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. या सुविधा मिळाल्यास विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फायदा होईल. सावर्डे आणि परिसरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.”
पादचारी पुलाच्या कामामुळे सावर्डे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. स्थानकावर आणखी सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल. त्यामुळे या कामासोबतच इतर मागण्याही पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला प्रादेशिक व्यवस्थापक बापट साहेब, रेल्वे अधिकारी संजय किल्लेदार, बंधू महाडिक, प्रदीप निकम, केतन पवार, विकास घाग, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, सचिन कोल्हापुरे, अरुण वारे, अनिकेत भंडारी, आनंद खांबे, विजय भुवड, देवराज गरगटे, सावर्डे, मांडकी व दहिवली येथील पोलीस पाटील, संजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, उमेश राजेशिर्के, महेंद्र तेटाबे, विकास नलावडे, प्रमोद खेडेकर, नितिन कोल्हापूरे, विनायक सावंत, विनय साळवी, रवी सावर्डेकर, दिनेश विचारे, संतोष कदम, सुभाष सावंत, कृष्णा खांबे, ज्ञानेश्वर घाग, भूषण वारे, लिंबानी शेठ, सुधीर जाधव, प्रथमेश निकम, आदी मान्यवर उपस्थित होते.
