लांजा : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या मनात प्रश्न विचारण्याची वृत्ती रुजावी आणि दैनंदिन जीवनातील घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागावी, या उद्देशाने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा व्हेळ नं. १ येथे १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जाणू विज्ञान – अनुभवू विज्ञान’ या संकल्पनेतून ‘हसत-खेळत विज्ञान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरात इयत्ता पाचवी ते सातवीतील ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिबिरामध्ये विज्ञानातील संकल्पना केवळ पुस्तकातून न शिकता त्या प्रत्यक्ष प्रयोगांतून समजून घेण्यावर भर देण्यात आला. अन्नपदार्थांतील पोषक घटक ओळखण्यासाठी विविध प्रयोग घेण्यात आले. बटाटा, रताळे, कांदा, गव्हाचे पीठ, मसूर डाळ, तांदूळ, तेल, शेंगदाणे आणि पॅकेटमधील खाद्यपदार्थ अशा विविध नमुन्यांच्या साहाय्याने अन्नातील घटकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच NOVA वर्गीकरणाच्या माध्यमातून अन्नपदार्थांवर होणाऱ्या प्रक्रियांची ओळख करून देत अन्नाकडे सजगपणे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

खेळण्यातून विज्ञान, विज्ञानातून आनंद! या भावनेतून विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान खेळणी स्वतः तयार केली. ‘उमलणारा कागदी हात’, ‘उमलणारा कागद’, ‘गरगणाऱ्या पिना’, ‘नाण्याची सर्कस’, ‘स्ट्रॉ स्प्रिंकलर’, ‘उडी मारणारी आगपेटी’ आणि ‘पेपर ग्लायडर’ अशा कृतींनी शिबिरात रंगत आणली. साध्या कागदासारख्या सहज उपलब्ध साहित्यामधूनही विज्ञानाचे रंजक प्रयोग करता येतात, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. स्वतःच्या हाताने वस्तू तयार करताना त्यांच्यातील सर्जनशीलता, निरीक्षणक्षमता आणि कृतीशीलता यांना चालना मिळाली.

गोष्टींतून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘तहानलेला कावळा’ या परिचित गोष्टीचे प्रयोगाद्वारे परीक्षण करण्यात आले. पाण्याची पातळी, पात्राचा आकार आणि त्यात टाकलेल्या दगडांचा परिणाम यांचे निरीक्षण करत विद्यार्थ्यांना गोष्टीतील प्रसंगाकडे चिकित्सकपणे पाहण्याची संधी मिळाली. ‘बुड बुड घागरी’ यांसारख्या परिचित संदर्भांचाही वैज्ञानिक विचारासाठी उपयोग करण्यात आला. एखादी गोष्ट ऐकून किंवा वाचून स्वीकारण्याऐवजी प्रश्न विचारणे, प्रयोग करून पाहणे, निरीक्षण नोंदवणे आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणे या प्रक्रियेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनुभवता आले.

शिबिरातील वातावरण उत्साही आणि कृतीप्रधान होते. विद्यार्थ्यांनी खेळणी तयार करताना आनंदाने सहभाग घेतला, एकमेकांना सहकार्य केले आणि प्रयोगांमागील कारणे जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. आपल्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना काही ठिकाणी मार्गदर्शनाची गरज भासली; मात्र प्रश्न विचारण्याची आणि स्वतः करून पाहण्याची त्यांची तयारी हे शिबिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. संदीप मोरे, श्री.रघुनाथ धावडे आणि श्री. विजय मोहिते तसेच स्वयंसेवक म्हणून शुभ्रा शिगम यांचे सहकार्य लाभले. शिल्पा रेडीज (चिपळूण) आणि सुहास शिगम (व्हेळ, लांजा) व विज्ञान शिक्षिका श्रीमती शिंदे यांनी शिबिराच्या आयोजनात व मार्गदर्शनात सहभाग घेतला.

पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेता येते आणि परिसरातील साध्या वस्तूंतूनही वैज्ञानिक विचारांना चालना मिळू शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश या शिबिरातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विज्ञान म्हणजे केवळ पाठांतराचा विषय नसून निरीक्षण, प्रयोग, प्रश्न आणि शोध यांचा आनंददायी प्रवास आहे, याची जाणीव करून देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरले.