खेड : खेड नगरपरिषदेने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नपाच्या वतीने शहरातील ८५ पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यासाठी १० लाख २० हजाराचे अनुदान थेट वितरीत करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात हे अनुदान जमा करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील लाभार्थ्यांना शौचालय उपलब्ध झाले आहेत. प्रति कुटुंब १२ हजार याप्रमाणे १० लाख २० हजाराचे रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीचा वाटा आहे. शौचालयाचे बांधकाम टप्प्या टप्प्याने पुर्ण व्हावे. आणि निधीचा योग्य प्रकारे वापर व्हावा. यासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर जागेची पाहणी पुर्ण झाल्यावर पाया बांधण्यासाठी ६ हजार रुपये अदा केले आहेत. शौचालयाचे पुर्ण बांधकाम, भांडे बसविणे व टाकीचे काम पुर्ण केल्याचे पडताळणी झाल्यानंतर ६ हजाराचा दुसरा हप्ता देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहरात प्रत्येक कुटुंबाला आरोग्यदायी व सुरक्षित जीवन जगता यावे. यासाठी एक घर एक शौचालय हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात आल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.
ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही. अशा कुटुंबियांनी नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे संपर्क साधून, स्वच्छ अभियान भारत अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.