खेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवलीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज) नामदार श्री. योगेश रामदास कदम यांच्या हस्ते आपुलकीचा मुक्काम या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवली येथे करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

​यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आंबवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी (१)कुमारी चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक.(२) कुमारी पूर्वा सतीश यादव: इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत ३२ वे स्थान.
​(३)कुमार रुद्र शरद कदम: इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १४१ वा क्रमांक. (४) कुमारी गौरी विनायक यादव: इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १६२ वे स्थान.
मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा
​विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नामदार योगेश रामदास कदम यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सदगुरू उर्फ नाना महादेव कदम, खेड पंचायत समितीचे उपसभापती सुनील मोरे, सुकिवली गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, तिसंगी गणाचे पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, आंबवली गावचे उपसरपंच विजय यादव, वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्ष सिद्धी यादव, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोगावले, प्रतिष्ठित नागरिक मारुती पांडुरंग यादव, राजेश यादव, विश्वास कदम आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर आणि उपशिक्षिका रसिका रमेश रेवाळे (खांडेकर) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना हे यश लाभले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.