खेड : कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन, खेड यांच्या वतीने शनिवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘समता दिन व महात्मा फुले विचार जनप्रबोधन कार्यक्रमाच्या’ नियोजनासाठी शनिवार दि. २४ ऑक्टोबर रोजी खेड येथे विविध सामाजिक व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक उत्साहात पार पडली.
खेड नगरपरिषद वाचनालयाशेजारील भाऊसाहेब पाटणे संकुल येथे झालेल्या या बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, आयोजन, नियोजन आणि विविध संघटनांचा सहभाग याबाबत चर्चा करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा समाजात प्रसार करणे, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या बैठकीला १) कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, खेड; २) त्रिरत्न बौद्ध महासंघ, खेड; ३) लोकशाही पत्रकार संघ, खेड; ४) भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबवली, ता. खेड; ५) कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई ६) युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड तालुक्यातील आणि परिसरातील समविचारी सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांना औपचारिक निमंत्रण देण्याचे ठरविण्यात आले. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करणे, आयोजन समिती व विविध उपसमित्या स्थापन करणे, अंदाजपत्रक तयार करणे, निधी संकलन, प्रसिद्धी आणि कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाबाबत पुढील नियोजन करण्यावर चर्चा झाली.
या उपक्रमात सर्व समविचारी संघटनांनी एकत्रितपणे सहभागी होऊन महात्मा फुले यांच्या समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पुढील नियोजन बैठक शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, भाऊसाहेब पाटणे संकुल, खेड नगरपरिषद वाचनालयाशेजारी, खेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संबंधित संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे यांनी केले आहे.
महात्मा फुले विचार जनप्रबोधन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खेडमध्ये विविध सामाजिक संघटनांची बैठक…!
