खेड : महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘महात्मा जोतीराव फुले पहिल्या महसूल लोक अदालती’मध्ये खेड तालुक्यातील १९ प्रलंबित प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या अखत्यारीत २८ महसूल लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून महसूल व जमिनीशी संबंधित वादांवर तोडगा काढण्यात यश आले.
महसूल व जमिनीच्या वादांमुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालये आणि न्यायालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. पक्षकारांच्या परस्पर संमतीने आणि सामंजस्यातून वाद मिटविण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला. येथील तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या अखत्यारीतील या मोहिमेत २८ लोक अदालतींच्या माध्यमातून १९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे संबंधित पक्षकारांना दिलासा मिळाला असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांवर परस्पर सहमतीने तोडगा काढण्याची संधी उपलब्ध झाली.
महसूल लोक अदालतींच्या माध्यमातून नागरिकांना जलद आणि सामंजस्यपूर्ण न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने खेड तालुक्यात हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. भविष्यातही नागरिकांनी महसूल लोक अदालतींचा लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढावीत, असे आवाहन तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी केले आहे.
खेडमध्ये महसूल लोक अदालतीत १९ प्रकरणांचा निपटारा…!
