लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंजणारी घाटात पुलाजवळील अपघातांचे सत्र सुरूच असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने पर्यायी मार्गाचा सर्व्हे सुरू केला आहे. यासाठी काजळी नदीत नवीन पूल उभारण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत असून या कामासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत येथे ९ अपघात घडले आहेत, यामध्ये एक चालक ठार झाला होता. तर गेल्या आठवड्यात कंटेनर आणि आयशर ट्रकचे चार अपघात झाले. अवजड वाहनांच्या अपघातांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसविण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अपघात सुरूच असल्याने त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंजणारी वरचा स्टॉप येथून काजळी नदीमार्गे पर्यायी रस्ता तयार करून नवीन पूल उभारण्याची शक्यता तपासली जात आहे. यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळाली असून पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे. हा पर्यायी मार्ग प्रत्यक्षात आल्यास आंजणारी पुलाजवळील अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.