सावर्डे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.,आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याची आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण करण्यात आली.
“अजितदादांचे अचानक जाणे ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे. जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, विकासाची तळमळ आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी कायम स्मरणात राहील. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना मन भावूक झाले. अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील,” असे भावनिक उद्गार काढून सौ. पूजा शेखर निकम मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी आपण दादांसारखेच खंबीरपणे उभे राहू आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहू अस सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. तसेच दादांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले सर्व बंधूंना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकारी अर्थात अजितदादांच्या लाडक्या बहिणींनीही त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून रक्षाबंधन साजरे केले. दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या प्रेमळ स्वभावाची, बहिणींप्रती असलेल्या आपुलकीची आणि आधाराची आठवण काढत महिला पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे प्रेम, आठवणी आणि कार्य सदैव आमच्या मनात जिवंत राहतील,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या भावपूर्ण प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करत “राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!” या भावनेतून सावर्डे पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. पूजा शेखर निकम यांच्या माध्यमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी सावर्डे पोलीस स्टेशनचे अधिकारी आबासो पाटील तसेच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कुटुंबापासून दूर राहून दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या सेवेला यावेळी मनापासून सलाम करण्यात आला.
“रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पोलीस बांधव आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे मत सौ. पूजा शेखर निकम यांनी व्यक्त केले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांप्रती व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आणि अजितदादांच्या स्मृतींना वाहण्यात आलेली श्रद्धांजली यामुळे कार्यक्रमाला भावनिक व सामाजिक बांधिलकीची विशेष किनार लाभली.
