खेड : – आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम आता कोकणातील औद्योगिक क्षेत्रावर दिसू लागला असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे. कोकणातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी म्हणून ओळख असलेल्या या औद्योगिक वसाहतीला गॅस टंचाई, कच्च्या मालाचा तुटवडा आणि कामगारांची घट अशा तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या मालाचे कंटेनर्स मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेक उद्योगांचे उत्पादन मर्यादित झाले असून काही कंपन्यांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. याचबरोबर कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा ही परिस्थिती आणखी गंभीर बनवत आहे. आवश्यक गॅस उपलब्ध नसल्यामुळे लोटे परशुराम एमआयडीसीमधील जवळपास ४० टक्के कंपन्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत.
या संकटाचा सर्वाधिक फटका बसत आहे तो कामगार वर्गाला. उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांना रोजगारापासून वंचित राहावे लागत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कामगारांनी नोकऱ्या सोडण्यास सुरुवात केली असून अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत.
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे कच्च्या मालाचा तुटवडा आणि तिसरीकडे कामगारांची घट या तिहेरी संकटामुळे संपूर्ण एमआयडीसीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. उद्योगपती आणि कामगार दोघेही मोठ्या अडचणीत सापडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनने या परिस्थितीची गंभीरता अधोरेखित करत तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोकणातील सर्वात मोठ्या लोटे परशुराम एमआयडीसीवर तिहेरी संकट !
