रत्नागिरी : “लाच देणे बंद करा, देशाचा विकास सुरू करा!” आणि “सजग नागरिक, सशक्त राष्ट्र!” अशा घोषणा देत तरुणाईने सादर केलेल्या पथनाट्याने आज शहरातील नागरिकांचे, प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरीच्या माध्यमातून सध्या दक्षता जनजागृती सप्ताह जिल्ह्यात सुरु आहे. यामध्ये र.प. गोगटे कला आणि विज्ञान आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून येथील मध्यवर्ती बसस्थानकावर भ्रष्टाचाराविरोधात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
यावेळी लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे आदी उपस्थित होते.
या पथनाट्यामध्ये दैनंदिन व्यवहारात नकळत घडणारा भ्रष्टाचार, शासकीय कामांतील गैरप्रकार आणि लाचखोरीमुळे सामान्यांची होणारी ससेहोलपट नाट्यरूपाने मांडण्यात आली. केवळ प्रशासकीय स्तरावरच नव्हे, तर एक नागरिक म्हणून आपण भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे मार्ग कसे टाळू शकतो, यावर कलाकारांनी प्रभावी प्रकाश टाकला.
ढोलकीच्या तालावर सुरू झालेल्या या पथनाट्याने काही क्षणांतच शेकडो प्रवाशी, पादऱ्यांची गर्दी जमवली. “कायद्याचे पालन करणे आणि लाच न देता कामे करून घेणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,” हा संदेश कलाकारांनी सहज आणि उपरोधिक संवादांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.
सत्यनिष्ठा आणि पारदर्शकतेची शपथ
पथनाट्याच्या शेवटी उपस्थितांना भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. कलाकारांनी उपस्थित जनसमुदायाला राष्ट्रनिर्मितीसाठी ‘सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाची प्रतिज्ञा’ दिली. कोणतीही लाच न देणे, लाचखोरीचा निर्भयपणे विरोध करणे आणि भ्रष्टाचाराची माहिती अधिकृत यंत्रणेकडे नोंदवणे, असा निर्धार यावेळी केला.
डिजिटल सुविधांचा वापर करण्याचा सल्ला
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपअधीक्षक श्री पाटील यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले, “आज बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन झाल्या असून डिजिटल प्रणालीच्या वापरामुळे पारदर्शकता वाढली आहे. नागरिकांनी अधिक सजग राहून भ्रष्टाचाराला पूर्णपणे नकार दिला पाहिजे.”
या पथनाट्यामुळे परिसरात समाजप्रबोधनाचा एक सकारात्मक संदेश गेला असून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ केवळ औपचारिकता न राहता लोकचळवळ बनत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.