इंदापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर ,शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहेत का,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह आणि भीषण आहे. शेतात पाणी नाही, हाताला काम नाही, महागाई गगनाला भिडली असून सुशिक्षित मुलांच्या कॉलेज व मेसच्या फीसाठी पालकांकडे पैसे उरलेले नाहीत. अशा संकटात शासन केवळ ५,००० रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे. बाजारात तेलाचा एक डबा २,६८० रुपयांना मिळतो, मग उरलेल्या पैशांत शेतकऱ्याने दिवाळी कशी साजरी करायची? कोल्हापूरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे १ लाख कोटी रुपये उपलब्ध आहेत, मग जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला हेक्टरी १ लाख रुपयांची थेट मदत देण्यासाठी यांच्या तिजोरीत खडखडाट का?, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,शासनाने स्वतः सुरू केलेल्या योजनेचे २०२६ मधील आधीचे ४,००० रुपये प्रलंबित आहेत आणि आताचे ५,००० असे एकूण ९,००० रुपये शासनाकडे येणे बाकी आहे. हेक्टरी १ लाख रुपयांची मागणी असताना ५ हजार देऊन बोळवण करणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,उत्तर प्रदेश सरकार स्वतःचे एक आणि केंद्र सरकारचे एक अशी दोन अन्नधान्याची पॅकेजेस गरीब व कष्टकऱ्यांना देते. मग महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार अतिरिक्त अन्नधान्य वाटप का सुरू करत नाही? साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा बँकांनीही या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,एका बाजूला शासन १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना मंजुरी देते आणि दुसरीकडे इथेनॉल निर्मितीच बंद करते. मग या गाड्या चालणार कशावर? या सरकारच्या एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी ताळमेळ नाही; डाव्या हाताला काय चालले आहे हे उजव्या हाताला समजत नाही, असा सावळा गोंधळ सुरू आहे,असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,उजनी धरणातील एआय डेटा सेंटरच्या प्रकल्पाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाला पत्र लिहून याला वाचा फोडली. ३१ तारखेला धैर्यशील दादा आणि आमदार रोहित पवार याविरोधात आंदोलन करत आहेत, असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आदरणीय शरद पवार साहेबांनी इंदापूरमध्ये सिनार मासचा प्रकल्प आणला, एमआयडीसी वाढवली, रस्ते आणि उजनी धरण उभे केले,इंदापूरकरांनी नेहमी सहकार्यच केले. मग आज कर्जत-भीमाशंकर येथील ३,००० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी जनतेला विश्वासात का घेतले जात नाही? विकासाला विरोध नाही, मात्र ‘एल निनो’ आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकट असताना पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे, असेही सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
