दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील MIDC वळणे येथे कार्यरत असलेल्या प्रांजल पॉलिमर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपल्या औद्योगिक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अबुधाबी (संयुक्त अरब अमिराती) येथे 2 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ADIPEC 2026 या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात कंपनी सलग दुसऱ्या वर्षी सहभागी होत आहे.
या प्रदर्शनात कंपनीचे प्रतिनिधित्व श्री. धनंजय कृष्णा रहाटवळ आणि कु. प्रांजली धनंजय रहाटवळ करणार आहेत. प्रदर्शनामध्ये कंपनीच्या वतीने स्टॉल क्रमांक 12752 येथे विविध औद्योगिक उत्पादने, नाविन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
प्रांजल पॉलिमर्सने स्वतः विकसित केलेल्या Flange Guards या मेड इन इंडिया उत्पादनाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यामुळे कंपनीला जागतिक बाजारपेठेतील उद्योजक, व्यावसायिक, ग्राहक आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधण्याची तसेच नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, दापोलीसारख्या तालुक्यातील MIDC परिसरातून कार्यरत असलेल्या कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग नोंदविणे ही संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद बाब आहे. स्थानिक स्तरावर उद्योग उभारून जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादने पोहोचविण्याच्या दिशेने कंपनीने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
‘स्थानिक उद्योग, जागतिक ओळख’ या संकल्पनेला बळ देणारा प्रांजल पॉलिमर्सचा हा सहभाग कोकणातील नवउद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
ADIPEC 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उद्योजक, व्यावसायिक आणि अभ्यागतांनी कंपनीच्या स्टॉल क्रमांक 12752 ला भेट द्यावी, असे आवाहन प्रांजल पॉलिमर्स इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने करण्यात आले आहे.