चिपळूण : कला ही केवळ रंगांची उधळण नसून मनातील भावनांना अभिव्यक्त करणारी सुंदर भाषा आहे. हस्तकला ही कल्पकतेला आकार देणारी आणि सृजनशीलतेला नवी दिशा देणारी साधना आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख फुटावेत, मनाला आनंद मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व उद्योजकता विकसित व्हावी या उद्देशाने श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाची शाळा, डेरवण येथे “Entrepreneurs Club” अंतर्गत दरवर्षी दीपावली पूर्वी ‘दिवाळी डिलाईट’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पणत्या सुशोभीकरण, सुगंधी उठणे, मेणबत्त्या, कंदील, अंगाचा साबण, गिफ्ट बॅग यांचे उत्पादन व विक्री या उपक्रमांचा समावेश असलेल्या या कार्यशाळेत इ. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत विविध आकार व प्रकारांच्या पणत्यांना आकर्षक रंगछटांनी रंगवून विद्यार्थ्यांनी पणत्यांचे सुशोभीकरण केले. पेपर कपचा वापर करून अत्यंत सुंदर व आकर्षक अशा लेस आणि रंगीत कागद वापरून कंदील बनविण्यात आले.
मेणापासून नानाविध फुले, रोझ पिलर्स, डॉल, फ्लोटिंग कॅन्डल्स, टी लाईट्स अशा मेणबत्त्यांची निर्मिती केली. तसेच जेलवॅक्स पासून काचेचे विविध प्रकारचे ग्लास, बाऊल्स वापरून विद्यार्थ्यांनी अनेक रंगांच्या पारदर्शक मेणबत्त्या साकारल्या. अनेक रंग, रंगीत रांगोळी, मणी, शंख शिंपले अशा वस्तूंच्या साहाय्याने सुबक सुवासिक मेणबत्त्या बनवण्याचा आनंद व आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी अनुभवला.
त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या अनेक औषधी व सुगंधी चूर्णांचा वापर करून विद्यार्थ्यांनी सुवासिक व उच्च प्रतिच्या आयुर्वेदिक उटण्याची निर्मिती केली. औषधी चूर्णांचे योग्य प्रमाणानुसार वजन करणे, त्यांचे एकत्रित मिश्रण करणे, अचूक वजन करून आकर्षक पद्धतीने पॅकिंग करणे अशा सर्वच क्रिया विद्यार्थ्यांनी सफाईदारपणे पार पाडल्या.
याव्यतिरिक्त विविध आयुर्वेदिक सुवासिक अत्तरांचा उपयोग करून तब्बल २३ प्रकारचे साबण बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. पॅराबेन, सल्फेट अशा रसायनांविरहित नैसर्गिकरित्या गुणकारी असलेला साबण बनविण्यात मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
कार्यशाळेत विविध वस्तू तयार करत असताना विद्यार्थ्यांची एकाग्रता, सांघिक भावना, सर्जनशीलता, क्रियाशीलता, कार्यकुशलता अशी विविध कौशल्ये विकसित झाली. अशा प्रकारच्या व्यवसायाभिमुख व विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्त करणाऱ्या कार्यशाळा नेहमीच शाळेत आयोजित करण्यात येतात अशी माहिती प्रशालेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव यांनी दिली.
