पुणे – पायल झांबरे प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज पायलच्या आईशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून, यासंदर्भात आपण पोलीस अधीक्षक यांच्याशीही चर्चा केली असल्याचे सांगितले.
“तुमच्या भावना मला समजू शकतात. मीसुद्धा एक आई आहे. अशा प्रकारच्या घटना घडायलाच नकोत; मात्र दुर्दैवाने ही घटना घडली आहे. या कठीण प्रसंगी तुमच्या भावना आणि वेदना मी समजू शकते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पायलच्या आईला धीर दिला.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि अधिक वेगाने व्हावा, तसेच ही केस फास्टट्रॅकवर घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय, पायलच्या कुटुंबियांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही सुनेत्रा पवार यांनी दिले.