छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची तातडीची मदत मिळणार असून, दुष्काळातील नुकसानभरपाई आणि इतर लाभही दिले जाणार आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचं सांगत, सरकार मदतीसाठी कोणताही हात आखडता घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ, शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्यामुळेच शिवसेनेचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहेत. शेतकरी आणि त्यांच्या मुलाबाळांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी आपणही जालन्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
