दोडामार्ग : टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी सकाळी दोडामार्ग शहरातील स्नेह रेसिडेन्सी येथील वळणावर घडली. राजकुमार सोनेलाल यादव (वय ३०) आणि जौहरी रामअवतार यादव (वय ३१, दोघेही रा. अरवल, ता. हरलापूर, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) अशी मृत युवकांची नावे आहेत.
राजकुमार यादव आणि जौहरी यादव हे सोमवारी सकाळी दुचाकीने दोडामार्गहून मेढेच्या दिशेने जात होते. याचवेळी समोरून दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोशी स्नेह रेसिडेन्सी येथील वळणावर त्यांच्या दुचाकीची जोरदार समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

कामाच्या शोधात आलेल्या दोघांवर काळाचा घाला
दोन्ही युवक रोजगाराच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग शहरात वास्तव्यास होते. ते एका फरशी बसविणाऱ्या कारागिराकडे काम करत होते. दिवाळीच्या काळात हे काम बंद असल्याने त्यांनी पेंटिंगचे काम करणाऱ्या दुसऱ्या कारागिराकडे काम सुरू केले होते. शनिवारपासून ते या कामावर रुजू झाले होते. मेढे येथे पेंटिंगच्या कामासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जौहरी यादव याला तीन लहान मुले असून, दोघांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.