मुंबई : राहुल नार्वेकर यांनी कुठल्याही शेतकऱ्याची किंवा आदिवासी बांधवांची फसवणूक करून व्यवहार केलेले नसल्याचे स्पष्ट करत श्री. बन म्हणाले की जनाब संजय राऊत, तुम्ही किती शेतकऱ्यांना फसवून अलिबागचे सातबारे स्वतःच्या नावावर केले, हे एकदा महाराष्ट्राला सांगा. राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप करण्याआधी उद्धव ठाकरे यांनी अलिबागमध्ये जमा केलेल्या 19 बंगल्यांचे नेमके पुढे काय झाले? ते बंगले पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिले का? तसेच संजय राऊत यांनी अलिबागमधील शेतकऱ्यांना फसवून लाटलेल्या काही एकर जमिनीचे पुढे काय झाले? त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना दिल्या का? याचा हिशोब आधी संजय राऊत यांनी द्यावा आणि मग राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप करावेत, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सरकार काम करत नाही, असे संजय राऊत म्हणतात. मग मेट्रो काय आकाशातून पडली का? अटल सेतू, कोस्टल रोड आणि समृद्धी एक्स्प्रेसवे काय आकाशातून पडले का? हे सरकार काम करत आहे आणि हे सरकार जनतेचे आहे. जनतेला हक्काची घरे देण्याचे काम या सरकारने केले आहे. एवढेच नाही तर संजय राऊत, तुम्ही ज्या पत्राचाळीत घोटाळा करून मराठी माणसाला लुटले, त्याच मराठी माणसाला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईतच हक्काची घरे दिली. हा आमच्यातला आणि तुमच्यातला फरक आहे. ज्यांनी घरे लुटली, मुंबईकरांना देशोधडीला लावले, त्यांनी हे सरकार काम करत नाही, असे म्हणणे हास्यास्पद आहे. बिनकामाचे सरकार उद्धव ठाकरेंचे होते, असे श्री. बन यांनी सुनावले.
सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांचे पूर्ण भाषण ऐकले आहे. सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडू नका किंवा सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडणे चुकीचे आहे, अशा पद्धतीचे विधान त्यांनी कुठेही केलेले नाही. एकंदरीतच कोणतेही पुस्तक फाडू नये, कोणत्याही पुस्तकाबद्दल वेडेवाकडे पाऊल उचलू नये. आपली संस्कृती ही पुस्तकांचा सन्मान करण्याची आहे, असे त्यांचे विधान आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले, त्याचे समर्थनही आशिषजी शेलार यांनी केलेले नाही, असे श्री. बन यांनी स्पष्ट केले.

प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणाऱ्या राहुल गांधींनी हिंदुत्व शिकवू नये

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदुत्व शिकवणारे राहुल गांधी निवडणुकीच्या काळात हिंदुत्वविरोधी भूमिका घेतात. हिंदूंच्या राम मंदिराचे उद्घाटन होऊन दोन वर्षे होत आहेत, मात्र निमंत्रण देऊनही सोनिया गांधी आणि राहुल गांधी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी किंवा भूमिपूजनासाठी आले नव्हते. प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व आणि विचार नाकारणारे आज हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत. दिल्लीतील शिखांच्या नरसंहारात तुमच्या पक्षाचा सहभाग होता. राम मंदिर आंदोलनावेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचे समर्थनही तुमच्याच पक्षातील नेत्यांनी केले होते. तुम्ही स्वतःला जानवेधारी म्हणवता पण तुमचे हिंदुत्व हे बेगडी आणि निवडणुकीपुरते आहे, अशी टीका श्री. बन यांनी केली.