जळगाव:- अवघ्या दीड महिन्यात विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १५५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तीव्र शब्दात टीका केली आहे. या आत्महत्या नसून नियोजित हत्या आहेत. ज्याचे मुख्य सुत्रधार हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये १२७, तर नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत २८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अमरावती विभागात दर आठ तासाला एका शेतकऱ्याचा मृत्यू होत असेल, तर यापेक्षा गंभीर परिस्थिती काय असू शकते? शेतकऱ्यांसाठी आधी घोषणा करायच्या, त्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करून त्याची जाहिरातबाजी करायची, मोठ्या बातम्या करायच्या मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही असाही आरोप त्यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रमुखांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५००० रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली होती. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण आज परिस्थिती काय आहे तर ७२ लाख शेतकऱ्यांना ही मदतच मिळाली नाही. त्यांची दिवाळी अंधारात गेली. सरकारच्या या हवेतील घोषणाच‌ शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडतात म्हणून हे सरकारच शेतकऱ्यांचे खरे मारेकरी आहेत असं त्या म्हणाल्या आहेत.