पेण (प्रशांत पोतदार ) : पेण येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ तथा मुद्रांक निरीक्षक प्रशांत आबाजी जगदाळे (वय ३३) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ॲन्टी करप्शन ब्युरो) ठाणे युनिटने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पेणच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदनिकेच्या नोंदणी करारासाठी शासकीय नोंदणी व मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त जगदाळे यांनी तक्रारदार वकिलाकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणीमध्ये तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने प्रशांत जगदाळे यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.