मुंबई : ​दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून आणि ‘VSR’ कंपनीच्या संशयास्पद व्यवहारांवरून आमचे युवा नेते आ. रोहितदादा पवार यांनी मांडलेली रोखठोक भूमिका तंतोतंत सत्यावर आधारित आहे. या प्रश्नांमुळे सत्तेत बसलेल्यांच्या पायाखालची जमीन सरकली असून, त्यातूनच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि खा. सुप्रियाताई सुळे यांना पत्र पाठवण्याचे केविलवाणे नाटक सुरू झाले आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

या संदर्भात महायुती सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवत ॲड. अमोल मातेले यांनी सरकारला खालील तीन प्रमुख मुद्द्यांवरून धारेवर धरले आहे.

पत्रांचे नाटक कशासाठी? मूळ प्रश्नांची उत्तरे द्या!

रोहितदादा पवार यांनी कोणताही हवेत तीर मारलेला नाही. ‘VSR’ कंपनीच्या मालकाशी देवेंद्र फडणवीस यांची जवळीक आहे आणि याच जवळिकीमुळे या अत्यंत गंभीर प्रकरणात अद्याप FIR दाखल होत नाही, हा आमचा साधा आणि टोकदार सवाल आहे. या थेट प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रे लिहून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा कुटिल डाव महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.

गृहमंत्री महोदय, मित्राच्या न्यायासाठी FIR का नाही?

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतःला दिवंगत अजितदादांचे चांगले मित्र म्हणवून घेतात. जर एवढी घट्ट मैत्री होती आणि स्व. अजितदादा त्यांच्याच मंत्रिमंडळात होते, तर मग त्यांच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी FIR दाखल करण्यापासून कोण रोखत आहे? पोलीस यंत्रणा आणि गृहखाते नक्की कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळालेच पाहिजे.

अचानक उफाळून आलेली ‘मैत्री’ आणि ढोंगी राजकारण

आज सत्तेत टिकण्यासाठी अजितदादा आणि फडणवीस यांच्या मैत्रीचे दाखले दिले जात आहेत. मात्र, अजितदादा हयात असताना हेच लोक त्यांच्यावर ‘गाडीभर पुरावे’ असल्याचा कांगावा करत सुटायचे. आज सत्तेचा मलिदा खाताना ती ‘मैत्री’ अचानक कशी आठवली? असल्या ढोंगी राजकारणाने सत्य कधीही लपवता येणार नाही.

लढा अधिक तीव्र होणार

रोहितदादा पवार यांनी मारलेला बाण थेट निशाण्यावर बसल्यानेच सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडाली आहे. अशा पत्रांच्या धमक्यांना किंवा दबावतंत्राला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कधीही भीक घालणार नाही. दिवंगत अजितदादांच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य महाराष्ट्रासमोर येईपर्यंत आमचा हा लढा आणि सरकारला प्रश्न विचारण्याची भूमिका अशीच अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला आहे.