चिपळूण: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी चिपळूण येथील आपल्या कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली.

यावेळी बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना जाधव भावुक झाले. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहगर्जनेच्या आवाजाची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील आणि देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना भास्कर जाधव यांनी लोकशाहीच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. देशात आणि राज्यात लोकशाहीचा विचका झाला असून राजकीय क्षेत्रातील नीतिमूल्ये आणि परस्पर विश्वासाचा ऱ्हास होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकीय हव्यासापोटी महाराष्ट्राची समृद्ध राजकीय परंपरा पायदळी तुडवली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे हयात नसल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनागोंदी वाढल्याची भावना व्यक्त करताना जाधव म्हणाले की, राजकीय सभ्यता जपणारे आणि राजकीय परिस्थितीतील अनागोंदीला आवर घालणारे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे. बाळासाहेबांसारख्या स्पष्टवक्त्या, निर्भीड आणि धडाडीच्या नेतृत्वाची उणीव आज राज्याला प्रकर्षाने जाणवत आहे.

या अभिवादन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, फैसल कासकर, सुभाष जाधव, नगरसेवक संजय गोताड, विकी नरळकर, अजय भालेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.