मुंबई  : परदेशात MBBS चे शिक्षण घेतल्यानंतर FMGE परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्रे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा प्रमाणपत्रांशी संबंधित वेबसाइट हॅक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून १५ ते २० लाख रुपये घेऊन बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्रे दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

दरम्यान, परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्यासाठी NBEMS मार्फत घेतली जाणारी FMGE परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (MMC) नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना काही उमेदवारांनी बनावट गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने महाराष्ट्र सायबरकडे याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आणि या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.