मुंबई- महाराष्ट्रात मे अखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पूर्व मान्सूनसाठी पोषक हवामान होत असून कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. आज 17 जिल्ह्यांना वादळी पावसाचा तर 9 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. मात्र, वादळी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. आज मुंबई ठाण्यासह, पालघर, रायगड या जिल्ह्यांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याच्या वारा, विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात हवापालट झाल्याचे चित्र आहे. वादळी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून आज पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 36-41 अंशांपर्यंत राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
