मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी साधी आदरांजलीही वाहिली नाही. या मुद्द्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा गटावर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेसची साथ कशासाठी, असा थेट सवाल त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना केला आहे. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून आपली भूमिका मांडली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला राहुल गांधी यांनी आदरांजली न वाहणे ही बाब विचार करायला लावणारी असल्याचे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. ज्या बाळासाहेबांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेची ओळख उभी राहिली, त्यांचाच वारसा सांगणारा उबाठा गट आता नेमकी कोणती भूमिका घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांच्या प्रत्येक अजेंड्यावर माना डोलावणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण आता का होत नाही, असा प्रश्न बन यांनी केला. राहुल गांधी यांच्या राजकीय नेतृत्वापुढे निष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडायचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विषय आला की मौन बाळगायचे, हा कसला स्वाभिमान, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेची स्वप्ने पाहताना बाळासाहेबांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान मात्र विसरायचा, हेच उबाठा गटाचे धोरण असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत की काँग्रेसची साथ, हे स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

स्वार्थासाठी विचारांशी तडजोड आणि निष्ठेची विक्री, हाच उबाठा गटाचा नवा राजकीय अजेंडा आहे का, असा सवाल उपस्थित करत नवनाथ बन यांनी उबाठा गटाच्या भूमिकेवर टीका केली आहे.