मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केलेले आरोप म्हणजे स्व. अजितदादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाचे महत्त्व कमी व्हावे म्हणून केलेला उपक्रम असून दुसरे काहीही नाही. त्यांनी आज जे केले त्यातून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचे संस्कार आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला मातीत घातले आहे. याचा करावा तितका धिक्कार कमी आहे, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. रोहित पवार यांच्या या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि आदरणीय शरद पवार साहेबांनीही आपली भूमिका तातडीने स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
रोहित सिंग आणि त्याची व्हीएसआर कंपनी ही 2013 पासून राजकीय पक्षांना आणि राज्य सरकारला विमान सेवा देत आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे केवळ रोहित सिंग याच्याशीच नाही तर अनेक वैमानिकांसोबत सार्‍याच नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशात कुणाच्या लग्नाला जाणे, ही सामान्य बाब आहे. अनेक वैमानिक आणि सहवैमानिकांसोबत त्यामुळे सार्‍याच नेत्यांचे फोटोही आहेत. एका फोटोवरुन असे आरोप करणे, हे अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण आहे, असे श्री. बन म्हणाले.