रायगड : आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने केली जाणारी टीका आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. या टीकेला सुनील तटकरे यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल प्रत्युत्तर दिलं आहे. इतकं प्रचंड बौद्धिक ज्ञान ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पामराने काय बोलावं, असा उपरोधिक टोला तटकरे यांनी लगावला. एवढं राजकीय बौद्धिक भाष्य ऐकल्यानंतर शांतपणे बसणं एवढंच माझ्या हातात आहे. मी मात्र माझं काम करत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, माझी बुद्धिमत्ता किंवा राजकीय स्तर खालावला आहे असं मी म्हणणार नाही, तर तो उंचावला आहे, असंही तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे काय आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असं सांगतानाच ‘We enjoy it, you all should enjoy it too’ असं इंग्रजीतून म्हणत त्यांनी महेंद्र दळवींना आणखी एक टोला लगावला. त्यामुळे तटकरे यांच्या या मिश्किल आणि उपरोधिक प्रतिक्रियेची रायगडच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.