मुंबई : दुबईला निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम जेलीची कंटेनरमधून चोरी झाल्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. तळोजा येथील गांधार ऑइल रिफायनरीमधून जेएनपीटीमार्गे दुबईला जाणाऱ्या कंटेनरमधून सुमारे ४०० लिटर पेट्रोलियम जेली चोरी करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी पाइपच्या साहाय्याने कंटेनरमधील जेली काढून पिकअप व्हॅनमधील बॅरलमध्ये भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. चोरी केलेल्या जेलीची किंमत सुमारे एक लाख रुपये असून, कंटेनर, पिकअप व्हॅन आणि ट्रेलरसह एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.