जळगाव :- एका महिलेला अश्लील शिवीगाळ आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी अलिबाग न्यायालयाने भाजप आमदार महेश बालदी यांना ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार महेश बालदी यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, कायद्यानुसार लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८(३) नुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. त्यामुळे माझी विधानसभा अध्यक्ष, राहुलजी नार्वेकर यांना विनंती आहे की काही दिवसांतच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आपले सभागृह हे सर्वोच्च आहे. या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्यासाठी, अधिवेशनाआधी या शिवराळ आमदाराला तात्काळ अपात्र ठरवा आणि ही ‘कीड’ वेळीच काढा..