दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची आणि भव्यदिव्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खेड येथे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या माध्यमातून सुमारे २० कोटी रुपये खर्च करून भव्य ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहे. हा मॉल संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव आणि प्रमुख व्यावसायिक केंद्र ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी केले.
देगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष दापोली,संजीवनी महिला प्रभाग संघ असोंड या प्रभाग संघ कार्यालयाच्या नूतन वास्तु उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नामदार योगेशदादा कदम म्हणाले की, दापोली मतदार संघातील मूलभूत विकासकामे मार्गी लावत असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक रूपाने सक्षम करणे आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणी ही माझी कौटुंबिक जबाबदारी आहे असे मी मानतो.त्यामुळे शहरापासून ते खेडगावा पर्यंत प्रत्येक ग्रामसंघ स्वतःच्या पायावर कसा भक्कमपणे उभा राहील, याकडे माझा विशेष भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उमेद च्या माध्यमातून एक ‘उमेद मॉल’ मंजूर केला आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यात करिता होणारा एकमेव उमेद मॉल हा खेड येथे सुमारे 20 कोटी खर्च करून उभारण्यात येणार आहे.त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी राबवले जाणारे उपक्रम आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य अधिकचे कौतुकास्पद होणार आहे. या मॉलमुळे जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ आणि हक्काचे व्यासपीठ आता खेड येथे उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे निश्चितच याचा फायदा महिला सबलीकरणासाठी होणार आहे याचा मनस्वी आनंद व्यक्त करत आज देगाव येथे उद्घाटन झालेले हे ग्रामीण भागातील पहिले प्रभाग संघ कार्यालय असल्याचे सांगत जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रभाकर गोलांबडे कोळबांद्रे पंचायत समिती गणाच्या सदस्या ममता शिंदे पांगरी तर्फे हवेली गणाचे सदस्य नरेश घरटकर या तीनही जणांचे यांचे काम अतिशय उत्तम सुरू असून,तुम्ही निवडून दिलेले तीनही लोकप्रतिनिधी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जनतेची सेवा करत आहेत असे सांगत त्यांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी जिल्हा महिला संघटिका रोहिणी दळवी युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष अमित पारदुले सभापती उन्मेष राजे, समाज कल्याण माजी सभापती भगवान घाडगे तालुका महिला संघटिका दीप्ती निखारगे, तालुका संघटक प्रकाश कालेकर संपर्कप्रमुख प्रदीप जाधव उपतालुकाप्रमुख अनंत करबेले सिनेट सदस्य सुनील दळवी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोलांबडे पंचायत समिती सदस्य नरेश घरटकर पंचायत समिती सदस्या ममता शिंदे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, समन्वयक विश्वास खांबे विभाग प्रमुख मोहन भागणे,दिनेश जावळे सामाजिक कार्यकर्ते फरमान बटे मुंबई संघटक शांताराम खळे सुनील चव्हाण देगाव सरपंच अनुराधा भोसले फणसू सरपंच रेखा खोपटकर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी,उमेद अभियानाचे पदाधिकारी महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
