गुहागर : तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) येथील शृंगारतळी ते आबलोली रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या बिबट्याच्या मादी पिल्लास वनविभागाच्या पथकाने अत्यंत सतर्कता आणि सुरक्षिततेने बचाव कार्य राबवून ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय तपासणीत पिल्लू पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे.
वेळंब (नालेवाडी) परिसरात शृंगारतळी ते आबलोली मार्गाच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती बाळकृष्ण ओक यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कोणतीही हानी न होऊ देता पिल्लास सुरक्षितपणे ताब्यात घेतले. यानंतर पिल्लाची पशुधन विकास अधिकारी श्री. जाणवले यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हे पिल्लू मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे चार ते पाच महिने आहे, तसेच ते सुस्थितीत असल्याची खात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
हे यशस्वी बचाव कार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत गुहागरचे वनपाल अमित निमकर, रानवीचे वनरक्षक श्री. गायकवाड, अडूरचे वनरक्षक श्री. मांडवकर आणि आबलोलीचे वनरक्षक श्री. पवार यांनी सहभाग घेऊन पिल्लास सुरक्षितरित्या ताब्यात घेतले.