पोलादपूर – तालुक्याच्या विकास कामाला प्राधान्य दिले असून पोलादपूर तालुक्याला जोडणाऱ्या सवाद ते दिविल मार्गे पोलादपूर या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सवादच्या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध केल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली. भोराव ते निगडे ८ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला गती आहे. यामुळे सवाद सप्तक्रोशीतील जनता पुणे आणि पोलादपूर तालुक्याच्या शहराशी जोडली जाणार आहे, असे सांगून राज्याचे रोहयो, खारजमीन विकास, फलोत्पादन मंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी सवाद येथील शंकर महाबळेश्वर देवस्थान मंदिर बांधकामासाठी २० लाखाचा निधी आणि स्वतःची ६ लाख ७५ हजार रुपये देणगी देऊन मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या एकजुटीतून भव्य मंदिर साकारले असून या मंदिराचे लोकार्पण येणाऱ्या पिढ्यांना पूर्वजांच्या आध्यात्मिक प्रेमाची साक्ष देईल, असे मत प्रतिपादन केले.
पोलादपूर तालुक्यातील सवाद येथील शंकर महाबळेश्वर मंदिराचे लोकार्पण मंत्री गोगावले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या महायात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गोगावले यांच्यासोबत व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर पं. स. सदस्य अनिल दळवी, रा.जि. प. माजी सदस्य मनोज काळीजकर, जि. प. सदस्या मनाली काळीजकर, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, पोलादपूर नगरपंचायत सभापती सिद्धेश शेठ, शिक्षण प्रसारक मंडळ सवाद धारवली विभाग संस्थेचे अध्यक्ष वाय. सी. जाधव, संस्थेचे कार्यवाह दत्तात्रेय उतेकर, मंडळाचे अध्यक्ष समीर विन्हेरकर , उपाध्यक्ष प्रकाश विन्हेरकर, मंदिराचे आर्किटेक्ट विलास जाधव, मुख्याध्यापक राजू जाधव, उपतालुकाप्रमुख शौक तारलेकर, माजी सभापती रवींद्र फुलसुंदर, शिवसेना कोर कमिटी सदस्य उमेश कालेकर, पुरोहित रमेश जंगम, देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना चारवेळा आमदार करणाऱ्या मतदारांनी जिल्हा परिषदेवर आपणासही चारवेळा निवडून दिल्याने या ऋणाची परतफेड जास्तीत जास्त विकासकामे करून करण्याचा मनोदय व्यक्त केला. सालाबाद प्रमाणे तालुक्यातील सवाद येथील पहिल्याच यात्रेच्या निमित्ताने शंकर महाबळेश्वर मंदिर परिसरातील महायात्रेनिमित्त हजारो शिवभक्तांनी उपस्थिती दर्शवून मनोभावे पूजा व दर्शनाचा लाभ घेतला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या महायात्रेनिमित्त नव्याने उभारण्यात आलेल्या त्रिपुरावर दीपप्रज्वलन व पूजन, महाआरती तसेच सहस्र दीपप्रज्वलन करण्यात आले. भगवान शंकर महाबळेश्वरांचा मुखवटा व शिवलिंगास आकर्षण फुलांनी व वस्त्राने केलेली सजावट लक्षवेधी होती.
या महायात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार) नेते हनुमंत जगताप, पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड, नागेश पाटील यांनीही शंकर महाबळेश्वर देवस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
