रत्नागिरी : नोव्हेंबरपर्यंत पाऊस थांबल्याने पालवीचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर थंडी सुरू झाल्यावर मोहर प्रक्रिया सुरू झाली आणि डिसेंबरमधील थंडीमुळे फुलोरा वाढल्याचे चित्र होते. मात्र, अचानक थंडीचे प्रमाण वाढल्याने आणि पूर्ण फुलोरा आल्यानंतर मोहर झडून गेला. फळगळतीबरोबरच फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा पिकाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

सध्या मोहराने बहरलेल्या आंब्याच्या बागा काळवंडलेल्या दिसत असून मोहर अक्षरशः करपल्याचे चित्र आहे. सुमारे ९० टक्के मोहरलेल्या झाडांना १० टक्केही फळधारणा झालेली नाही. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून कीटकनाशके आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या करण्यात आल्या आहेत.

या परिस्थितीचा परिणाम आंबा बाजारपेठेवर होणार असून अवीट गोडी असलेल्या हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहकांना एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.