मंडणगड : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंडणगड तालुक्यात विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडणगड शहरातील जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप व फळे वितरण, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व मंडणगड तालुकाध्यक्ष मुज्जफर मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर रोजी हे उपक्रम राबविण्यात आले.यावेळी युवक तालुकाध्यक्ष साईराज सावंत, शाळेचे मुख्याध्यापक सुहास रांगले, श्री वसावे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथेही संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी श्री. सुदाम सकपाळ यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करून संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब पोस्टुरे युवक तालुकाध्यक्ष साईराज सावंत, रजनीकांत धोत्रे, शैलेश तांबे गावचे पोलीस पाटील, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांपासून ग्रामस्थांपर्यंत संविधानाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राबविलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे
