मुंबई : IDBI बँकेची परकीय भांडवलदारांना विक्री करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी IDBI बँकेचे अधिकारी, सर्व श्रेणींमधील कर्मचारी आणि इतर सर्व बँकांमधील कर्मचाऱ्यांची एक सभा आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे होत असलेल्या या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, वरिष्ठ आर्थिक पत्रकार राजीव रंजन सिंग, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस एस. नागराजन व AIIDBIOA सरचिटणीस विठ्ठल कोटेश्वर राव हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँगेसच्या अर्थ विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना विश्वास उटगी पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयडीबीआय बँकेचा कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज लिमिटेड’ (Fairfax Financial Holdings Ltd) सोबतच्या आक्षेपार्ह कराराला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीय क्षेत्रावर ताबा मिळवू पाहणाऱ्या परकीय भांडवलशाहीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश काँग्रेसचा ‘अर्थ विभाग’ (Department of Economy) गेल्या काही महिन्यांपासून एक निरंतर मोहीम राबवत आहे. या पार्श्वभूमीवर, आयडीबीआय (IDBI) बँकेचे अधिकारी, सर्व श्रेणींमधील कर्मचारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते व कार्यकर्ते यांची संयुक्त सभा शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे, असेही विश्वास उटगी म्हणाले.