मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया सध्या मुंबई, महाराष्ट्रात छठ पूजा हा मुद्दा वापरून संघर्ष निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या आणि त्यातून सुरू असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स टाकल्या जात आहेत. हे पुरेसे नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली. मात्र, या सगळ्यातून भाजपला अपेक्षित असलेला संघर्ष अजून उभा राहत नाही, ही त्यांची खंत आहे. हा सगळा आटापिटा आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचा थिंक टँक बौद्धिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे, असे दिसते. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू-मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून ‘बघा, आता हे आपल्या मैदानांपर्यंत आणि बागांपर्यंत आले आहेत’ असे सांगून लोकांना घाबरवायचे. अर्थात, हिंदू स्त्रिया आणि पुरुष बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचे. मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला, अशी टीका त्यांनी केली.
मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हटले आहे की, भाजपला कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाहीत हे कळले की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात, तोदेखील एक वरवरचा देखावाच आहे. खरे काम निवडणूक आयोगच करते. पण विजय कसा झाला, यासाठी पसरवायला एक कारण मिळते, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. लवकरच हे घडणारच आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२-१४ वर्षांत जे जे केले आहे, त्या सगळ्याची भुते यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात, त्यांचे जे व्हायचे आहे ते होईलच!
मराठी माणसांनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये!
माझी मराठी माणसांना विनंती आहे की, त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धतदेखील नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील; पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला, कधी आणि कसे उत्तर द्यायचे, हे आपण ठरवू. यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचे नाही, हे नक्की.
भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे. इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रातदेखील हेच सुरू आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहूबाजूंनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे. आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले, तो सह्याद्रीदेखील यांनी पोखरायला सुरुवात केली आहे. जंगले दिली जात आहेत, जमिनी दिल्या जात आहेत. त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिले जात आहे; पण आम्हाला त्याचे काहीच वाटत नाहीये.
मी अनेकदा सांगत आलो आहे की, आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही. काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक-दोन दिवसांत परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडत आहे, हे सगळे मराठी माणसाने विसरले नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे, तरच शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो!
बाकी, पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच (अर्थात, कोणी तशी हिंमत करेल असे वाटत नाही), तर शांत आहोत म्हणजे कमजोर नाही आहोत, हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे!
उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजालादेखील समजले पाहिजे की, हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभे करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल, तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे! येथे मरहट्टे राहतात!
भाजपला सांगणे आहे की, धार्मिक, राज्याराज्यांत किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करण्यापेक्षा आता काही नवीन सुचत आहे का ते पाहा!
मराठी बांधवांना, भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की, यांच्या सापळ्यात अडकू नका; पण सतर्क राहा! योग्य वेळी निर्णय घेऊ!
