लांजा : भांबेड येथील सोनूबाबा कुर्णेकर पायी दिंडी सेवा संस्थेच्या वतीने वै. ह. भ. प. सोनूबाबा कुर्णेकर यांच्या ६०व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भांबेड येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सद्गुरू वै. ह. भ. प. धोंडोपंत हदादासाहेब व वै. ह. भ. प. दत्तोपंत महाराज बडवे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच गुरुवर्य प्रसाद महाराज बडवे यांच्या आशीर्वादाने आणि ह. भ. प. संतोष महाराज कुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुण्यतिथी सोहळा पार पडणार आहे.

दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित वारकऱ्यांच्या हस्ते दीपपूजन, ध्वजापूजन, समाधीपूजन, गाथापूजन, ज्ञानेश्वरीपूजन व वीणापूजन करण्यात येईल. यानंतर पहाटे काकडा भजन, सकाळी कीर्तन व गाथा भजन, दुपारी विविध कार्यक्रम, सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तन, तर रात्री जागराचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत.

या सप्ताहात दि. ८ डिसेंबर रोजी ह. भ. प. बजरंग महाराज कर्जुलेकर (आळंदी), दि. ९ डिसेंबर रोजी ह. भ. प. बाबा महाराज केसरकर (कोल्हापूर) व गाथामूर्ती शुभम महाराज शितोळे (आळंदी), दि. १० डिसेंबर रोजी ह. भ. प. दादा महाराज मोरे (मुंबई), दि. ११ डिसेंबर रोजी ह. भ. प. श्रीपाद महाराज बडवे (पंढरपूर) आणि दि. १२ डिसेंबर रोजी ह. भ. प. बाळासाहेब महाराज देहूकर (पंढरपूर) यांची कीर्तने होणार आहेत.

या सोहळ्यात भांबेड, माजळ, इंदवटी, रावरी, जावडे, बोरथडे, गोलप, लांजा, व्हेळगाव, आरगाव, रिंगणे, कोंडगे, कुरंग, पाचळ, कोर्ले व प्रभानवल्ली या गावांतील वारकरी सहभागी होतात.

दि. ११ डिसेंबर रोजी दिंडी मिरवणूक व प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. श्री महादेव मंदिर येथून दिंडीला सुरुवात होईल. त्यानंतर केदारलिंग मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेथून दिंडी महालक्ष्मी मंदिरात जाईल व सायंकाळी समाधी मंदिरात पोहोचेल.

या संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संतोष शेवाळे, उपाध्यक्ष बाबा केसरकर, सेक्रेटरी नामदेव गुरव, खजिनदार शिवाजी चव्हाण आणि प्रमोद गुरव हे सोहळ्याच्या आयोजनासाठी कार्यरत आहेत.