मुंबई : सांताक्रूझ-कालीना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या मुंबई पुस्तक महोत्सवाच्या पाचव्या दिवशीही पुस्तकप्रेमींचा उत्साह पाहायला मिळाला. महोत्सवाच्या माध्यमातून वाचन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळत असून, पाचव्या दिवशीही पुस्तक खरेदीसाठी वाचकांचा उत्साह कायम राहिला. स्टॉलचालकांनी फिक्शन, बालसाहित्य तसेच इतिहास विषयक पुस्तकांच्या विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारताचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे आणि संचालक युवराज मलिक यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या दिवसाच्या साहित्यिक कार्यक्रमांची सुरुवात मनीष पचौली आणि विवेक अग्रवाल लिखित ‘मुंबई माफिया’ या पुस्तकावरील चर्चासत्राने झाली. त्यानंतर हितेश आहुजा यांनी ‘टर्निंग मॅनेजमेंट बाय मॅक्सिमम इन्टू मॅक्सिमम मॅनेजमेंट’ या विषयावर केस स्टडीच्या माध्यमातून आपले विचार मांडले.
पंचतंत्रातील कथांच्या उर्दू अनुवादावर आयोजित चर्चासत्रात वक्ते डॉ. शेख मोहम्मद शकील आणि इम्तियाज गोरखपुरी यांचे स्वागत डॉ. मिलिंद मराठे यांनी केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे उर्दू संपादक डॉ. इम्तियाज अली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात सुप्रसिद्ध लेखक अक्षत गुप्ता यांनी श्वेता पडा यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यक्रमांमध्ये सन्मान म्हणून पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक भेट देण्याची परंपरा सुरू करावी, असे आवाहन केले. ‘कालजयी कहानियों की शाश्वत कथाएं’ या सत्रात त्यांनी आपल्या आगामी ‘द अदर इंडियन’ या पुस्तकाचीही माहिती दिली.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन या विषयावर गार्गी संधू, डॉ. समीर वैशाली, सुभाष गुधाटे आणि पुंडलिक पै यांनी आपले विचार व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी प्रसिद्ध युद्धकथा लेखक कुलप्रीत यादव यांच्याशी संवाद साधला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या संवादामुळे उपस्थित श्रोत्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. यादव यांनी त्यांच्या ‘हाजीपीर की शौर्य गाथा’ या पुस्तकाच्या लेखनप्रक्रियेविषयी माहिती दिली.
मुंबईतील पुस्तकप्रेमींनी या भव्य पुस्तक महोत्सवाच्या आयोजनासाठी मुख्य आयोजक अमित साटम आणि मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांचे कौतुक केले.
महोत्सवात 600 हून अधिक पुस्तक स्टॉल्स असून, विविध साहित्यप्रकार तसेच विविध भारतीय आणि परदेशी भाषांमधील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे. हा महोत्सव रविवार, 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.