गुहागर : उकळत्या तेलातून हाताने प्रसादाचे वडे काढण्याची दीडशे वर्षांची परंपरा गुहागर तालुक्यातील कुडली गावाने जपली आहे. कार्तिकी शुद्ध एकादशी, द्वादशी व त्रयोदशीला येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर येथील उत्सवात ही परंपरा जोपासली जाते. हा उत्सव सतत तीन रात्र प्रतिवर्षी साजरा केला जातो. उकळत्या तेलातून पाळीदार मानकरी हाताने प्रसादाचे पाच वडे काढून ते देवाला नैवेद्य दाखवतात.
यावर्षीचे उत्सावाचे पाळीदार केतन कृष्णाजी निमकर व निलेश मनोहर निमकर आणि संपूर्ण परिवार हे होते. एकादशीला सकाळी श्रींची पूजा करून श्रीविष्णू यागाला सुरुवात झाली संध्याकाळी उपासाचा फराळ भाविकांसाठी देण्यात आला. त्यानंतर कीर्तन, आरती, छबिना असे कार्यक्रम संपन्न झाले. द्वादशीला सकाळी श्रींची पूजा करून विष्णू याग पूर्णहुती संपन्न झाली. त्यानंतर दुपारी महाप्रसाद भाविकांसाठी देण्यात आला. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाल्यानंतर रात्री सर्व भाविकांसाठी फराळ देण्यात आला होता. त्रयोदशीला सकाळी श्रींची पूजा झाली. उकळत्या तेलातून प्रसादाचे पाच वडे काढण्यात आले. यावर्षीचे वडे काढण्याचे मानकरी नरेंद्र मनोहर निमकर होते. हे प्रसादाचे पाच वडे काढले कुडली गावामध्ये दीडशे वर्षांपासून ही परंपरा अखंडित चालू आहे.
उत्सवात दुपारी सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात आला. रात्री आरती छबिना कीर्तन हे कार्यक्रम संपन्न झाले. रात्री १० वाजता श्रीरंगनिर्मित रत्नागिरी यांचे दोन अंकी धमाल कॉमेडी ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाट्य प्रयोगाचे आयोजकत्व श्री देव लक्ष्मीनारायण फंड मुंबई यांनी केले. त्या रात्री २.०० वाजता लळीताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता झाली. या उत्सवासाठी कुडली सर्व निमकर ग्रामस्थ मंडळी तसेच मुंबईस्थित सर्व निमकर मंडळी यांनी सहाय्य केले. सौ. नेत्राली राजेंद्र जुवेकर, नरेंद्र निमकर, केतन निमकर, डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी महाप्रसादाचे आयोजकत्व केले होते.